महामार्गावर प्रवाशाच्या लुटीप्रकरणी दोघांना अटक; सिंहगड रोड पोलिसांची यशस्वी कारवाई
पुणे : देहुरोड–कात्रज बायपास महामार्गावर प्रवासी म्हणून कारमध्ये बसलेल्या तरुणाला मध्यरात्री लुटल्याच्या प्रकरणात सिंहगड रोड पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेने महामार्गावरील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी निखिल अरविंद पवार (वय २७, रा. मातोश्री अपार्टमेंट, वेताळनगर, आंबेगाव) आणि रोहन शाम पवार (वय २७, रा. पाटील बिल्डिंग, जाधवर कॉलेजसमोर, नर्हे) हे दोघेही पुण्यातील रहिवासी आहेत. विशेष म्हणजे, रोहन पवार हा यापूर्वी दोन खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांमध्ये अडचणीत सापडलेला सराईत गुन्हेगार आहे. ही घटना ३० मे रोजी मध्यरात्री वडगाव बुद्रुक येथील स्वर्णा हॉटेलसमोर घडली होती. स्वरूप अरुण कदम (वय २५, रा. नर्हेगाव) हे कोल्हापूरला जाण्यासाठी महामार्गावर थांबले होते. देहुरोडवरून आलेल्या कारला हात दाखवून ते त्यात प्रवासी म्हणून बसले. नवले पुलाच्या पुढे गेल्यावर गाडीत असलेल्या चौघांनी अचानक कदम यांच्यावर हल्ला चढवला. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांच्या कानातील सोन्याची बाळी, मोबाईल आणि चांदीची अंगठी असा ३५ हजार रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. त्यानंतर ससेवाडी परिसरात महामार्गावरच त्यांना गाडीतून ढकलून देत आरोपी फरार झाले. या घटनेनंतर स्वरूप कदम यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी नवले पुलाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित वाहनांची माहिती मिळवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढण्यात आला. दरम्यान, पोलीस कर्मचारी देवा चव्हाण, सागर शेडगे आणि निलेश भोरडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील संशयित आरोपी भुमकर चौकात थांबला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत निखिल पवार याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत या लुटीत रोहन पवार याचीही भूमिका असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या आरोपी रोहन पवारलाही अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली सुमारे ४ लाख रुपये किमतीची हुंडाई कार आणि लुटलेला मोबाईल असा एकूण ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरोधात लुट, मारहाण आणि अन्य संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, विकास बांदल, देवा चव्हाण, सागर शेडगे, निलेश भोरडे, राहुल ओलेकर, गणेश झगडे, विनायक मोहिते, सतीश मोरे, संदिप कांबळे, तानाजी सागर, समीर माळवदकर, शिरीष गावडे यांच्या पथकाने केली आहे.
मुख्य संपादक : संतोष सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा