डेटिंग अ‍ॅपवरून सुरू झालेलं नातं पोहोचलं सायबर छळ आणि बदनामीपर्यंत; पुण्यातील शिक्षिकेने दाखल केली पोलिस तक्रार


पुणे : सोशल मीडियावरून सुरू झालेल्या ओळखीचं रूपांतर समलैंगिक संबंधात झाल्यानंतर त्या नात्याचा अंत सायबर अत्याचार, खोट्या आरोपांनी बदनामी आणि मानसिक त्रासात झाला आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यात एका शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीतून सोशल मीडियावर नातेसंबंध, खाजगी माहितीचा गैरवापर आणि वैयक्तिक आयुष्यावरील डिजिटल धोक्यांचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. धनकवडी परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय शिक्षिकेने आपल्या तक्रारीत नमूद केलं आहे की, तिच्या पतीची आणि एका हॉटेल व्यावसायिकाची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. काही वेळातच ही ओळख इतकी वाढली की, दोघांमध्ये जवळपास दोन वर्षे समलैंगिक संबंध राहिले. सुरुवातीला या नात्यात सुसंवाद होता, मात्र काळानुसार त्याचे परिणाम कुटुंबावर आणि वैयक्तिक आयुष्यावर होऊ लागल्याने शिक्षकाने हे संबंध तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र नातं संपवणं या व्यावसायिकाला मान्य नव्हतं. यानंतर सुरू झाला सायबर छळाचा एक भयावह प्रवास. तक्रारीनुसार, हॉटेल व्यावसायिकाने शिक्षिकेच्या पतीचे आणि स्वतःचे खाजगी व अश्लील फोटो वापरून समलैंगिक डेटिंग अ‍ॅपवर फेक प्रोफाईल तयार केली. इतक्यावरच न थांबता, या प्रोफाईलवर शिक्षिकेचे फोटो वापरून तिला "एचआयव्ही पॉझिटिव्ह" असल्याचे खोटे आरोप करत अत्यंत अपमानास्पद पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या. या प्रकारांमुळे शिक्षिकेच्या संपूर्ण कुटुंबाची समाजात बदनामी झाली. त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीच्या शाळेत आणि परिसरात कुटुंबाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. इतकंच नव्हे, तर आरोपी सतत सोशल मीडियावर धमक्याही देऊ लागला. तो थेट त्यांच्या घरासमोर येऊन गोंधळ घालू लागल्याने कुटुंब भयभीत झाले. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गवड यांनी सांगितले की, तक्रारदार महिला ही शिक्षिकेची पत्नी आहे आणि संबंधित तिघे काही काळ एकत्र राहत होते. तिने तिच्या फोटोचा सायबर माध्यमांवर गैरवापर होत असल्याचे नमूद केले असून, तिची वैयक्तिक माहिती, प्रतिष्ठा आणि मानसिक आरोग्य यावर मोठा आघात झाल्याचेही स्पष्ट केले. गुन्हे शाखेच्या निरीक्षक सुरेखा चव्हाण यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार हे स्पष्ट झाले आहे की शिक्षकाने विवाहानंतरही हॉटेल व्यावसायिकासोबत संबंध ठेवले होते. परंतु नातं संपविल्यानंतरच बदनामी, फोटो शेअर करणे, खोटे प्रोफाईल तयार करणे आणि धमक्या देण्याचा प्रकार सुरू झाला. शिक्षिकेने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली असून, सायबर गुन्ह्यांच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे वैयक्तिक संबंधांच्या आडून डिजिटल माध्यमांतून होणाऱ्या मानसिक छळाची तीव्रता पुन्हा एकदा उजेडात आली आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास

पिस्टलचा धाक दाखवणाऱ्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी केली अटक; इटालियन बनावटीचे पिस्टल जप्त