कोंढव्यात महिला शिक्षकेच्या गळ्यातील मंगळसूत्राची जबरी चोरी; मोपेडवरील दोघांचा धुमाकूळ


पुणे : कोंढवा परिसरात दिवसाढवळ्या जबरी चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्युशन संपवून घरी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र मोपेडवरील दोन अनोळखी इसमांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असून, या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वय ४७ वर्षे, रा. कोंढवा, पुणे या दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास ट्युशन संपवून आपल्या दुचाकी मोपेडवरून घरी जात होत्या. त्या सुग. पवार हाईट्स बिल्डिंगसमोर, गल्ली क्रमांक ३, काकडे वस्ती, कोंढवा येथे पोहोचल्या असता त्यांच्या पाठीमागून मोपेडवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी अचानक युटर्न घेत त्यांच्या जवळ गाडी आणली. क्षणाचाही विलंब न करता आरोपींनी फिर्यादी यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले आणि वेगाने पळ काढला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे फिर्यादी घाबरून गेल्या. परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही आरोपींनी धाडसाने चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ९६२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास