फुरसुंगीत बंद फ्लॅट फोडून घरफोडी; टेरेस व बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करून सोन्याच्या बांगड्या लंपास
पुणे : फुरसुंगी परिसरात बंद असलेल्या फ्लॅटमध्ये घरफोडीची घटना उघडकीस आली असून, अज्ञात चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने घरात प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरी केल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी इसम वय ६५ वर्षे, रा. फुरसुंगी, पुणे हे आपल्या राहत्या फ्लॅटला कुलूप लावून बाहेरगावी गेले असताना ही चोरी घडली. दि. १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते दि. १० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत, अॅक्वा मॅजस्टिक हाऊसिंग सोसायटी, फ्लॅट क्रमांक एफ-१०८, फुरसुंगी, पुणे येथे अज्ञात इसमाने घरफोडी केली. चोरट्यांनी प्रथम घराच्या टेरेसवरील दरवाजाचे कुलूप कशाच्यातरी सहाय्याने उचकटले. त्यानंतर बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढून त्या मार्गाने घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी बेडरूममधील कपाटाची झडती घेतली. कपाटात ठेवलेल्या सुमारे १ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरट्यांनी लंपास केल्या. घरमालक घरी परतल्यानंतर ही चोरी उघडकीस आली. तत्काळ त्यांनी फुरसुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ४२६/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३) व ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा