दिवसा घरफोडी करणारी सराईत टोळी समर्थ पोलिसांनी केली जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल हस्तगत


पुणे : पुणे शहरात दिवसा घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होत असतानाच समर्थ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने सराईत गुन्हेगारांना जेरबंद करून मोठे यश मिळवले आहे. मंगळवार पेठ परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणातील आरोपींना अटक करून पोलिसांनी तब्बल ८ लाख ११ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी मंगळवार पेठ येथील फिर्यादी यांच्या राहत्या घराचे बंद दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. घरामधील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण ७ लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २५७/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३०५(१), ३३१(१)(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार समर्थ पोलीस स्टेशनचे तपास पथक तसेच गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. या तपासात सुनिल मल्हारी तलवारे, वय ३८ वर्षे, रा. केएसबी चौक, अजंठानगर, मशिदीजवळ, आकुर्डी, पुणे तसेच एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत सुनिल तलवारे याने गुन्ह्याची कबुली दिली. चोरीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी आपल्या साथीदाराकडे दिल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पिंपरी-चिंचवड परिसरात शोध घेऊन शिवानंद दशरथ मोची उर्फ मोची मामा, वय ४० वर्षे, रा. भिमशक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली, ता. हवेली, जि. पुणे यास ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपी सुनिल मल्हारी तलवारे व शिवानंद दशरथ मोची यांना अटक करून सखोल तपास केला असता, त्यांच्याकडून चोरीतील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ८ लाख ११ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांनी पुणे शहरातील खराडी पोलीस स्टेशन, चंदनगर पोलीस स्टेशन तसेच रायगड जिल्ह्यातील महाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतही घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. समर्थ पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असून पुढील तपास सुरु आहे. सदरची कामगिरी ही अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-०१ कृषिकेश रावले, सहा. पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अनुजा देशमाने, समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार वाहन चोरी व दरोडा पथक २ कडील सहा. पोलीस निरीक्षक बेरड, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे, भाग्येश यादव, विक्रांत सासवडकर, विनायक येवले यांनी केली आहे.


मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास