दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस गुन्हे शाखा युनिट ३ कडून शिताफीने अटक
पुणे : पुणे शहरात दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेला पुन्हा एकदा यश आले आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे व रेकॉर्डवरील आरोपीस गुन्हे शाखा युनिट ३ ने शिताफीने जेरबंद केले असून, या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास पोलीस प्रशासनाला मोठे बळ मिळाले आहे. दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ चे पोलीस अमंलदार पंढरीनाथ शिंदे, अमोल काटकर, किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे व तुषार किंद्रे हे वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने सिंहगड रोड, नांदेड सिटी व उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. याच दरम्यान पोलीस अमंलदार पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत अत्यंत महत्त्वाची व खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार उत्तमनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक १४५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६), ३३३, ३ (५), ३२४ (४) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (सी), १३५ प्रमाणे दाखल असलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हा त्याच्या राहत्या घरी वडगाव बुद्रुक, पुणे येथे आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची तात्काळ खातरजमा करून गुन्हे शाखा युनिट ३ कडील पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. सापळा यशस्वी ठरवत संबंधित पाहिजे आरोपीस कोणतीही अनुचित घटना न घडवता शिताफीने ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर आरोपीकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी करण्यात आली असता, त्याने सदर गुन्ह्यात आपला सक्रिय सहभाग असल्याची कबुली दिली. यानंतर त्याचा सविस्तर गुन्हे अभिलेख तपासण्यात आला असता तो यापूर्वीही विविध गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेला रेकॉर्डवरील आरोपी असल्याची माहिती पुढे आली. सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त गुन्हे शाखा पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त गुन्हे १ विजय कुंभार यांच्या मार्गदर्शन व सुचनेनुसार युनिट ३ चे सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अमंलदार पंढरीनाथ शिंदे, अमोल काटकर, किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, तुषार किंद्रे यांनी केली आहे.
मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा