बुधवार पेठेतून घरी जात असलेल्या नागरिकाचा पाठलाग करून फसवणूक; बनावट आरोप करून दोघांनी उकळले पैसे, पुणे पोलिसांकडून अटक
पुणे : शहरातील बुधवार पेठेसारख्या संवेदनशील परिसराशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेश्याव्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागात जाऊन निघालेल्या एका नागरिकाचा काही अज्ञातांनी पाठलाग केला आणि त्याच्यावर बदनामीची भीती दाखवून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुणे पोलिसांनी वेळेत लक्षात घेऊन उघडकीस आणली असून, बनावट आरोप करून फसवणूक करणाऱ्या दोघा तरुणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना फिर्यादी बुधवारी पेठेमधून घरी परतत असताना घडली. संबंधित व्यक्ती काही कामानिमित्त या परिसरात गेला होता. तिथून निघाल्यावर त्याचा दोन तरुणांनी पाठलाग सुरू केला. हे दोघे थेट त्याच्या घरीच पोहोचले आणि त्याला अडवून आरोप करू लागले की, ‘‘तुम्ही आमच्याकडून ऑनलाइन वीस हजार रुपये भरलेत आणि आम्हाला त्याबदली कॅश दिली नाही, आमची फसवणूक केली आहे.’’ त्याचवेळी या आरोपींनी त्याला धमकी दिली की, ‘‘तू बुधवार पेठेत गेला आहेस, हे सर्व ठिकाणी सांगू. तुझी बदनामी करू. आम्ही पोलिसांकडे तक्रार करू की तू आम्हाला फसवलंस.’’ अशा दबावाखाली पैसे उकळण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होत होता. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पोलिसांच्या ११२ हेल्पलाइनवर कॉल करून उलट फिर्यादीविरोधातच तक्रार देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘‘या व्यक्तीने आमच्याकडून वीस हजार रुपये घेतले आणि फसवणूक केली.’’ या फोन कॉलनंतर नांदेड सिटी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक चौकशीत पोलिसांना काहीतरी संशयास्पद वाटले आणि त्यांनी सर्व घडामोडींची बारकाईने शहानिशा केली. यावेळी आरोपींचा बनाव उघडकीस आला. या दोघांनी बनावट आरोप करून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी कोणतीही हुलकावणी न खाता संबंधित दोघा आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आयुष राजू चौगुले आणि सदफ पठाण अशी असून, हे दोघे पुण्यात अशा प्रकारे फसवणूक करण्याचा सगळा डाव आखत होते. पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांच्या कारवायांना वेळीच लगाम घालता आला. या प्रकरणामुळे बुधवार पेठेतील सुरक्षेबाबत आणि कायद्याच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बनावट आरोप करून नागरिकांना फसवणे आणि बदनामीची धमकी देणे हा अत्यंत धोकादायक प्रकार मानला जात असून, नागरिकांमध्ये या प्रकारामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पुणे पोलिसांनी या घटनेत अतिशय दक्षता व सतर्कता दाखवून त्वरित कारवाई केल्याने मोठी फसवणूक टळली. या प्रकाराची शहरात तीव्र चर्चा असून, या घटनेनंतर अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू करण्यात आली असून, अशा फसवणुकीच्या इतर प्रकरणांचा तपासही सुरू आहे.
मुख्य संपादक : संतोष सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा