खासगी क्लिनिकमध्ये २७ वर्षीय तरुणीचा विनयभंग; ७३ वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल
पुणे : शहरातील विश्रामबाग रोड परिसरातील एका खासगी क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय रिसेप्शनिस्ट तरुणीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी ७३ वर्षीय सुरेशचंद चोरडिया या वृद्धाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरातील वैद्यकीय संस्थांमधील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी गेल्या काही महिन्यांपासून संबंधित क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत आहे. नेहमीप्रमाणे ती आपल्या कामावर होती. मात्र, एके दिवशी ती क्लिनिकमध्ये एकटीच असलेल्या संधीचा गैरफायदा घेत सुरेशचंद चोरडिया यांनी तिच्या गालाला हात लावत “पप्पी दे” अशी अश्लील आणि अत्यंत अपमानास्पद मागणी केली. पीडितेला प्रचंड धक्का बसला, परंतु त्यानंतरही आरोपीने आपली मर्यादा ओलांडली. घटनेनंतर आरोपीने तरुणीला पैशांचे आमिष दाखवले आणि हॉटेलमध्ये जेवणासाठी नेऊन “मनासारखं करण्याची” विकृत ऑफर दिली. ही अश्लील मागणी ऐकून तरुणीला अधिकच धक्का बसला आणि ती तात्काळ क्लिनिकमधून बाहेर पडली. मात्र, इतक्यावरच न थांबता आरोपीने तिचा पाठलाग करत पुन्हा त्रास दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या सर्व प्रकारामुळे मानसिकदृष्ट्या खचलेल्या पीडितेने थेट विश्रामबाग पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी सुरेशचंद चोरडिया याच्यावर विनयभंग, महिलेला मानसिक त्रास देणे, अश्लील प्रस्ताव देणे व पाठलाग केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. विश्रामबाग पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून, महिलांच्या कार्यस्थळी सुरक्षिततेसंबंधी असलेले प्रश्न यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आले आहेत.
मुख्य संपादक : संतोष सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा