मैत्रिणीच्या छेडछाडीवरून वाद; मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून
पुणे : पुणे शहरात मैत्रिणीच्या छेडछाडीवरून झालेल्या वादातून एका तरुणाचा दगड घालून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आंबेगाव परिसरातील जांभुळवाडी तलावाजवळ शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या प्रकरणी आंबेगाव पोलिसांनी एका युवकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणाचे नाव रोहित नामदेव ढमाळ (रा. योगमुद्रा बिल्डिंग, भूमकर वस्ती, नऱ्हे, सिंहगड रस्ता) असे असून, आरोपीचे नाव सूरज गणेश सूर्यवंशी (रा. गणेश पेठ) आहे. सध्या तो पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला आहे. या घटनेची माहिती मृत रोहितचा मित्र दीपक सुखदेव बंडगर (वय २१, रा. प्रतीक हाईट्स, पारी कंपनीजवळ, नऱ्हे, सिंहगड रस्ता) याने आंबेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून पुढे आली. दीपक, रोहित आणि सूरज हे तिघेही एकमेकांचे मित्र होते. मात्र काही दिवसांपूर्वी सूरजने त्यांच्या एका मैत्रिणीची छेड काढल्याचा प्रकार घडला होता. या कारणावरून रोहित आणि सूरज यांच्यात तणाव निर्माण झाला होता. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे तिघे जांभुळवाडी तलावाजवळ गेले होते. त्याठिकाणी सूरज आणि रोहित यांच्यात पुन्हा एकदा मैत्रिणीच्या विषयावरून जोरदार वाद झाला. वाद विकोपाला जाताच सूरजने जवळच पडलेला एक मोठा दगड उचलून रोहितच्या डोक्यात जोरदार फेकून मारला. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला. दीपकने तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच रोहितचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दीपकने पोलिसांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेता वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, आरोपी सूरज सूर्यवंशी हा घटनेनंतर घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी आंबेगाव पोलिसांनी तपासाचा धडाका लावला आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे करत आहेत.
मुख्य संपादक : संतोष सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा