खडक पोलीस ठाण्यात नाट्यमय प्रकार; गावठी दारू प्रकरणी अटकेनंतर भावाच्या सुटकेसाठी रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे : काशीवाडी परिसरात गावठी दारू विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारास पोलिसांनी अटक केल्यानंतर, त्याने थेट पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न करत खळबळ उडवून दिली. आपल्या भावाला अटक करू नये, त्याऐवजी मला घ्या, अशी मागणी करत त्याने स्वतःच्या दोन्ही हातावर व पोटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. खडक पोलिसांनी या दोघांना अटक केली असून, याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी, १८ जून रोजी दुपारी दीड वाजता खडक पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी पोलीस अंमलदार आशिष आदिनाथ चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे दिनेश संजय जाधव (वय ३४) आणि अजय संजय जाधव (वय ३६, दोघे रा. काशीवाडी) अशी आहेत. तर दत्ता जाधव (रा. भवानी पेठ, काशीवाडी) याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस दिलेल्या माहितीनुसार, काशीवाडी येथील जयप्रकाश बालवाडीच्या जवळ बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता खडक पोलिसांनी गावठी दारू विक्रीवर कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी दिनेश आणि अजय जाधव यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून १८ लिटर गावठी दारू आणि ५ हजार ८५० रुपये रोख असा एकूण ७ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन खडक पोलीस ठाण्यात आणले. गुन्हा दाखल करून अटकेची प्रक्रिया सुरू असताना अजय जाधव याने नाट्यमय प्रकार केला. "गावठी दारू विक्रीचा धंदा मी आणि दत्ता जाधव मिळून करतो. माझा भाऊ दिनेश या प्रकरणात निरपराध आहे, त्याच्याऐवजी मला अटक करा. अन्यथा मी आत्महत्या करेन," असे म्हणत त्याने आपल्या खिशातून काढलेल्या ब्लेडने स्वतःच्या दोन्ही हातांवर आणि पोटावर गंभीर स्वरूपाचे वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून त्याला रोखले आणि वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या प्रकारानंतर सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि आत्महत्येचा प्रयत्न या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अजय जाधव हा यापूर्वीही बेकायदा गावठी दारू विक्रीसारख्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर असून त्याच्यावर पूर्वीचेही गुन्हे नोंदवले आहेत. खडक पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
मुख्य संपादक : संतोष सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा