पुणे-सोलापूर महामार्गावर पार्क केलेल्या बस व टँकरमधून ४०० लिटर डिझेल चोरी; लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या अंधारात पार्क केलेल्या एका एस.टी. बस आणि टँकरमधून सुमारे ४०० लिटर डिझेल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीचा प्रकार हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील ताम्हाणेवस्ती परिसरात घडला असून, बुधवारी (दि. १८ जून) सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. चोरीच्या या घटनेमुळे महामार्गावरील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी रमेश आप्पाराव पोटभरे (वय ५२, रा. एस.टी. कॉलनी, पुणे-सातारा रोड, स्वारगेट) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी रमेश पोटभरे हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी (१७ जून) ते वल्लभनगरहून तुळजापूरकडे जाणारी प्रवासी बस घेऊन निघाले होते. सायंकाळी सातच्या सुमारास थेऊर फाट्याजवळील हॉटेल एस-४-जीजवळ बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे कोणताही मॅकेनिक मिळू न शकल्याने पोटभरे आणि वाहक कांबळे यांनी बस महामार्गाच्या बाजूला पार्क केली आणि दोघेही बसमध्येच विश्रांतीसाठी झोपले. बुधवारी सकाळी सुमारास जाग आल्यावर त्यांनी बसची तपासणी केली असता, डिझेल टाकीची झाकण मोडून टाकी रिकामी करण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात चोरट्यांनी तब्बल १६ हजार रुपये किमतीचे सुमारे २०० लिटर डिझेल बसच्या टाकीतून चोरून नेले होते. याच दरम्यान, अब्दुल नियाज अहमद खान हे टँकरचालक देखील मंगळवारी पुणे-सोलापूर महामार्गावरून जात होते. त्यांचा टँकर फाट्याजवळच पंचर झाल्याने त्यांनीही आपल्या वाहनाला बसच्या पाठीमागेच लावले होते. रात्रीच्या वेळेस झालेल्या या घटनेत त्यांच्या टँकरच्या डिझेल टाकीतूनही चोरट्यांनी सुमारे १८० लिटर डिझेल चोरले. याची किंमत अंदाजे १४ हजार ४०० रुपये इतकी आहे. या दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकूण सुमारे ३० हजार ४०० रुपयांचा डिझेल चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे महामार्गावर पार्क करून राहणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी महामार्गाच्या ठिकाणी होणाऱ्या अशा डिझेल चोरीच्या घटना वारंवार समोर येत असून, वाहनचालक व चालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गणेश सातपुते या प्रकरणाचा तपास करीत आहे.
मुख्य संपादक : संतोष सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा