आंबेगावमध्ये नणंदेच्या छळाला कंटाळून विवाहितेची मुलासह आत्महत्या : परिसरात हळहळ
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचे पडसाद अद्याप थांबले नसतानाच, कात्रजमधील आंबेगाव परिसरात आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मयुरी शशिकांत देशमुख या ३१ वर्षीय विवाहितेने आपल्या सहा वर्षांच्या एकुलत्या मुलासह इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठा खळबळ माजली असून, पुन्हा एकदा महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराचे गंभीर स्वरूप समोर आले आहे. घटनेतील मृत मयुरी देशमुख या मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील रहिवासी होत्या. त्या सध्या कात्रज येथील आंबेगाव परिसरातील दळवीनगरमधील ‘कल्पकसृष्टी’ सोसायटीमध्ये वास्तव्यास होत्या. त्या एका खासगी शाळेत बालवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती शशिकांत देशमुख हे एका बँकेत नोकरी करत असून, दोघांना विष्णु नावाचा सहा वर्षांचा एकुलता एक मुलगा होता. बुधवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. मयुरी यांनी आपल्या मुलाला सोबत घेत इमारतीच्या टेरेसवर जाऊन दोघांनी खाली उडी मारली. उडी मारण्याच्या वेळी मयुरी यांचे पती घरात नव्हते. मोठा आवाज ऐकून सोसायटीमधील रहिवासी घटनास्थळी धावले. त्यांनी पाहिले असता मयुरी आणि त्यांचा मुलगा विष्णु हे दोघेही गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ दोघांनाही जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती मयुरी आणि विष्णु या दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करताना टेरेसवर एक वही मिळवली असून, त्यामध्ये मयुरी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीत त्यांनी आपल्या नणंदेकडून होणाऱ्या सततच्या मानसिक त्रासामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाल्याचे स्पष्टपणे लिहिले आहे. "नणंदेच्या त्रासाला कंटाळून मी हे पाऊल उचलत आहे," असे त्यांनी नमूद केले आहे. ही सुसाईड नोट पोलिसांच्या ताब्यात असून, तिच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांकडून तपास सुरू असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मयुरी देशमुख आणि त्यांच्या निरागस मुलाच्या दुर्दैवी अंताने पुन्हा एकदा संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. पोलिसांकडून नणंदेच्या भूमिकेची चौकशी करण्यात येत असून, दोषीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक झिने यांनी सांगितले.
मुख्य संपादक : संतोष सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा