वाहत्या पाण्यात ढकलून मित्राचा खून; वर्षभरानंतर उघड झालेली थरारक घटना
पुणे : पार्टीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या तीन मित्रांमध्ये किरकोळ वाद झाल्यानंतर, उन्नतीनगर येथील कॅनोलजवळ वाहत्या पाण्यात ढकलून एका मित्राचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही घटना गेल्या वर्षी ४ मे २०२४ रोजी घडली असून, तब्बल वर्षभरानंतर हडपसर पोलिसांनी या आकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास करून खूनाचा गुन्हा नोंदवला आहे. खून झालेल्या व्यक्तीचे नाव विनोद मधुकर शार्दुल (वय ४५, रा. हडपसर) असे आहे. या प्रकरणी वैभव मनोज जाधव (वय ४२, रा. छत्रपती संभाजीनगर) आणि अशिष (पूर्ण नाव अद्याप अस्पष्ट) या दोघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसीना शिकलगार (वय ३६) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दिली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद, वैभव आणि अशिष हे तिघे ४ मे २०२४ रोजी सायंकाळी उन्नतीनगर परिसरात कॅनोलजवळ पार्टीसाठी जमले होते. पार्टी दरम्यान काहीसा किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका वाढला की वैभव व अशिष यांनी संतापाच्या भरात विनोदला जवळील वाहत्या पाण्यात ढकलले. त्यामुळे विनोदचा बुडून मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी प्रथम आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, विनोद यांच्या पत्नीने हा खून असल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी यानंतर सखोल चौकशी सुरू केली. घटनास्थळावरील साक्षीदारांच्या जबाबांमधील विसंगती, आरोपींच्या उत्तरांमधील गोंधळ, तसेच डॉक्टरांनी अहवालात दिलेला ‘बळजबरीने बुडवून मृत्यू’चा उल्लेख यामुळे पोलिसांचा संशय बळावला. संपूर्ण चौकशीनंतर हडपसर पोलिसांनी याप्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू असून आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणामुळे स्थानिक परिसरात खळबळ उडाली आहे. मित्रांमधील वाद इतका टोकाचा जाईल, याची कल्पनाही कोणाला आली नव्हती. हडपसर पोलिसांचे या प्रकरणातील सूक्ष्म तपासामुळे वर्षभरानंतर सत्य उघडकीस आले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस करीत आहेत.
मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा