पुण्यातील हडपसरमध्ये भीषण अपघात! भरधाव टेम्पोच्या धडकेत ८२ वर्षीय महिलेचा मृत्यू


पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी (ता. २२ मे) सकाळी साडे आठच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. हडपसर येथील रविदर्शन चौकात भरधाव वेगाने धावणाऱ्या टेम्पोने एका ज्येष्ठ महिलेस जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला असून, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिलेचे नाव विमलाबाई मथुराप्रसाद अगरवाल (वय ८२, रा. लोणावळा, पुणे) असे आहे. तर अपघात करणाऱ्या टेम्पोचा चालक विनोद भगवान गायकवाड (वय ४५, रा. लोणी काळभोर, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी विमलाबाई यांचे नातू मनोज अगरवाल (वय ३७, रा. लोणावळा) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमलाबाई अगरवाल या गुरुवारी सकाळी हडपसरमधील रविदर्शन चौक परिसरात जात होत्या. त्याच वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत टेम्पोचालक विनोद गायकवाड याला ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने व अविचाराने भरधाव वेगात वाहन चालवले, अशी माहिती समोर आली आहे. या निष्काळजीपणामुळे विमलाबाई अगरवाल यांचा मृत्यू झाला, असा ठपका फिर्यादीने ठेवला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१), २८१ व मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच, हडपसर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक हसिना शिकलगार हे करीत आहेत.

मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास