वारजे परिसरात थरार; दरोड्याच्या तयारीत असलेला 'टाक गँग'चा प्रमुख सोनू टाक पोलिसांच्या जाळ्यात
पुणे : वारजे परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुन्हेगार टोळीतील प्रमुख सोनू कपूर सिंग टाक याला आज पहाटे पोलिसांनी नाट्यमय कारवाईत थरारक पाठलाग करत अटक केली. ही कारवाई म्हाडा कॉलनीजवळ पहाटे ३.५५ वाजता पार पडली असून संपूर्ण घटनेचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनू टाक आणि त्याच्या टोळीतील इतर सदस्य जीपमधून आले होते आणि धारदार शस्त्रांसह मोठ्या दरोड्याची योजना आखत होते. 'टाक गँग' ही पुणे आणि उपनगरांमध्ये गुन्हेगारी कारवायांसाठी कुप्रसिद्ध असून यापूर्वीही या टोळीवर विविध गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. दरोड्याच्या आधीच एका सतर्क नागरिकाने पोलिसांना संशयास्पद हालचालींची माहिती दिली. माहिती मिळताच वारजे पोलिसांनी तातडीने पथक पाठवले. म्हाडा कॉलनी परिसरात पोलिसांनी सापळा रचत जीपचा पाठलाग सुरू केला. त्या वेळी पोलिसांशी हातघाई करत टोळीतील काही सदस्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत सोनू टाकला ताब्यात घेतले. सोनूकडून २.५ किलो वजनाचे चांदीचे दागिने, धारदार हत्यारे आणि इतर दरोड्याच्या वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे. सोनू टाकविरोधात यापूर्वी पुणे शहरासह हडपसर, नेरूळ, सांगवी, चतु:शृंगी, देहूरोड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणी सोनू टाक, सचिन वाघमारे, सलीम, बाबा आणि इतर अज्ञात साथीदारांविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून उर्वरित फरार आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मुख्य संपादक : संतोष सावंत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा