थेऊरमध्ये महिलेला गंडवून मंगळसूत्र चोरी; लोणी काळभोर पोलिसांनी दोघांना केली अटक


पुणे : पाणी मागण्याच्या बहाण्याने आणि चिक्की खरेदी करताना महिलेला गाफिल ठेवून गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पलायन करणाऱ्या दोन तरुण चोरट्यांना लोणी काळभोर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. ही घटना हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील बोडके वस्ती परिसरात रविवारी (२९ जून) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगीता पंडीत बोडके (वय ४८, रा. बोडके वस्ती, काकडे मळा रोड, थेऊर) या फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार त्या त्यांच्या घराजवळील ‘निलेश किराणा स्टोअर्स’ या स्वमालकीच्या दुकानात काम करत होत्या. दरम्यान, सायंकाळच्या वेळेस दुचाकीवरून दोघे अनोळखी तरुण दुकानात आले. त्यांनी आधी पाण्याची बाटली खरेदी केली व ती बाहेर जाऊन रस्त्यावर उभे राहून पिली. त्यांपैकी एकजण पुन्हा दुकानात आला आणि चिक्की मागू लागला. संगीता बोडके चिक्की देण्यासाठी वाकल्या असता, त्या तरुणाने क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या गळ्यातील सुमारे १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले जबरदस्तीने हिसकावून घेतले व दुचाकीवर बसून काकडे मळा दिशेने पसार झाला. या घटनेमुळे बोडके या हादरल्या, मात्र त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेतली. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्या तपास पथकाने घटनास्थळासह थेऊर, लोणी काळभोर, कुंजीरवाडी आणि उरुळी कांचन परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच गुप्त माहितीदारांमार्फत केलेल्या शोध मोहिमेअंती दोन्ही चोरट्यांची ओळख पटवण्यात आली. सचिन अर्जुन ढगे (वय १९, रा. माऊली नगर, कात्रज) आणि रोहित राजू माने (वय २५, रा. निंबाळकर वस्ती, दत्त मंदिराजवळ, कात्रज) अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे यापूर्वीही किरकोळ गुन्ह्यांमध्ये गुंतलेले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास पथकाने दोघांना सापळा रचून अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने अटक केली. पोलिसी चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.













सदरची उत्कृष्ठ कामगिरी पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस हवालदार गणेश सातपुते, रामहरी वणवे, तेज भोसले, अण्णा माने, सागर जगदाळे, संभाजी देवीकर, पोलीस अंमलदार सुरज कुंभार, प्रदीप गाडे, राहुल कर्डीले, सचिन सोनवणे, चक्रधर शिरगिरे, प्रवीण दडस, योगेश पाटील, शैलेश कुदळे, बाजीराव विर व महिला पोलीस उषा थोरात यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास